करिअर आंनदी असावे
प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सहज, सुंदर क्षणापैकी एक म्हणजे करिअर संपन्नता. पण काही व्यक्तीच्या आयुष्यात हाच सर्वात कटू आणि क्लेशदायक बनून पुढे आलेला पहायला मिळतॊ . अवास्तव अपेक्षा आणि चुकीची निवड यास खासकरून कारणीभूत ठरते.
जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला ईश्वराने एक स्वतंत्र देणगी दिलेली असते. कोणाच्या तरी कुंचल्यातून सुंदर चित्र साकारते. एखाद्याची कविता चार ओळीत खूप मोठा अर्थ सांगून जाते. एखाद्याचे नृत्य देहभान विसरायला लावते. सतारीच्या तारा छेडत असताना समोरच्याला स्वतः मध्ये ती उतरल्याची जाणीव होते.एखाद्याच्या गळ्यात मोहून टाकणारीजादू असते. प्रत्येक व्यक्तिची प्रतिभा स्वतंत्र असते. प्रत्येकाकडे एक स्वतंत्र कौशल्य हातोटी व कला असते. परंतू आपण त्याकडे नकळत दुर्लक्ष करीत असतो. जसे झाडाच्या कोणत्या फांदीला पहिले फळ येईल आणि कोणत्या फांदील फुलं हे सांगता येत नाही त्याप्रमाणे कोणत्या कौशल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव व कुशलता याकडे दुर्लक्ष करू नये. आजकालच्या सर्व तरुणांना डॉक्टर, इंजिनिअर होणे म्हणजेच करिअर घडवणे असे वाटते. पण यामुळे समाजाच्या गरजांची पूर्तता होणार आहे काय? अंगभूत गुणांचा, क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणे, मानसिक समाधान मिळवणे, आर्थिक स्थैर्य टिकवणे म्हणजेच करिअर. मग ते कोणत्याही क्षेत्रात करता येते. मुलांना नेहमी सांगितले जाते, तू आमक्या सारखा हो. पण तुझ्या कर्तृत्वाने, रंगाने, गंधाने आणि अंगभूत गुणांनी भरलेले तुझे व्यक्तिमत्व आम्हाला अपेक्षित आहे. असा आग्रह पालकांनी धरायला हवा. या संदर्भातले लोकमान्य टिळकांचे उदाहरण महत्त्वाचे वाटते. तुरुंगातून आपल्या चिरंजीवांना पाठवलेल्या पत्रात लोकमान्य लिहितात, 'आयुष्यात आपण कोण व्हायचे, काय व्हायचे हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी तुम्हालाच आहे. अगदी चप्पल बांधणाऱ्या चर्मकाराचा जरी व्यवसाय करावासा वाटला, तरी मला दुःख वाटणार नाही. पण तो तुम्ही इतक्या उत्तम रीतीने करा, की लोकांनी म्हणावे, चपला घ्यावा तर टिळकांकडूनच. करिअर निवडताना आपल्या आवडीचा म्हणजेच अभिरुचीचा विचार करणे आवश्यक असते. कारण ज्या व्यवसायात आपल्याला 35-40 वर्षे काम करायचे आहे, त्यातून आनंद मिळायला हवा. आवडीचे काम असल्यास मिळणारे समाधान, आनंद द्विगुणित होतो. मात्र अभिरुचीप्रमाणे व्यवसाय न निवडल्यास चिडचिड होणे, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडणे असे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण एका क्षेत्रातील मात्र, आपल्या आवडीनुसार असलेल्या वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेऊन यशस्वी झालेली उदाहरणे आपल्याला दिसतात.डॉ.गिरीश ओक, डॉ.श्रीराम लागू अगदी अलीकडील डॉ अमोल कोल्हे, डॉ निलेश साबळे हे वैद्यकीय डॉक्टर्स पण अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. हर्षा भोगलेंनी इंजिनीयरिंग व मॅनेजमेंट करून क्रिकेट समालोचक म्हणून नाव मिळवले, असे अनेक खेळाडू आणि कलाकार आपल्या ह्या निमित्ताने आठवल्याशिवाय रहाणार नाही.
म्हणजे स्वत:ची आवड, छंद यातून उत्तम करिअर करता येते.संभाव्य करिअर मार्गांचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास शिक्षण विद्यार्थ्यांना मदत करते.
आज काळ बदलेला असताना ठराविक ठिकाणीच करिअर करावे हा विचार बदलला पाहिजे. उपलब्ध करिअर पर्यायांपैकी असे कितीतरी पर्याय आहेत की जे अपल्याला माहिती सुद्धा नसतात.
शेवटी काय? एका ठराविक क्षेत्रात प्राविण्य मिळवून सर्व गरजा भागू शकतील इतका पैसा, मानसिक समाधान आणि समाजात पत निर्माण करता आली की आपले करिअर यशस्वी झाले असे समजायला हरकत नाही.
Comments
Post a Comment